- अपयशाने खचून जाऊ नका आत्मविश्वासातच यश..
- पोलीस उपनिरीक्षक अभिजीत मानेंचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ एप्रिल २०२१) :- अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने व परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यास त्याला यश निश्चित मिळते, असे विचार पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या व मुंबईत रुजू होणार्या अभिजीत माने या तरुणाने सांगली जिल्ह्यातील येळावीत व्यक्त केले.
परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईला रुजू होण्यापूर्वी तो आपल्या मूळ गावी आला. त्यावेळी तो बोलत होता. अभिजितने भारती विद्यापीठ, प्रशाला तुरची फाटा येथील विद्यालयात दुसरी ते दहावीपर्यंतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अकरावी-बारावी पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयात पूर्ण केली.
पुढील शिक्षणासाठी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली येथे प्रवेश घेतला. बीसीएस पदवी मिळवली. एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करणाऱ्या इस्लामपूर येथील खाजगी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शन घेतले. पहिल्या दोन प्रयत्नात अभिजीतला यश मिळाले नाही. त्यानंतर निराश न होता पुन्हा नव्या जोमाने रात्रंदिवस अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यश मिळवले व पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. त्याच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशात वडील आनंद माने व रेखा माने यांचा मोलाचा वाटा आहे.