- चिखली घरकुल परिसरात पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एका पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चिखली पोलिसांनी घरकुल येथे रविवारी ही कारवाई केली. ओंकार रवींद्र गुंजाळ (वय २५, रा. घरकुल, चिखली), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकुल, चिखली येथील घरकुल परिसरातील पीरबाबाच्या दर्ग्याजवळील झाडाखाली एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी संतोष सकपाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयन करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्याने हे पिस्तुल कोठून आणले, याबाबत विचारपूस केली असता सराईत गुन्हेगार सलीम मेहबूब शेख (सध्या रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ रा. देहूरोड) याने दिल्याचे सांगितले. शेख हा सध्या एका येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे.