- कारवाईत एकाच दिवशी तब्बल ९४ हजारांचा दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या १५४ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकाच दिवसात ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी (दि. ३) पिंपरी – चिंचवड शहरात ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल्स आदी गर्दीची ठिकाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश आहेत.
शनिवारपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पिंपरी – चिंचवडमध्ये स्थानिक पोलिसांसह सुमारे पाचशे पोलिस रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत. शहरातील एकूण ४५ महत्त्वाच्या ठिकाणी बॅरिगेटिंग लावून नाकाबंदी आणि ३० ठिकाणी गस्त सुरू आहे.
शनिवारी (दि. ३) सायंकाळी सहा नंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही काही दुकाने आणि हॉटेल्स सुरूच होती. अशा १५४ जणांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी ९४ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.