- नवनियुक्त पालिका आयुक्तांचा अनुभव पणाला..
- पालिका प्रशासन व कोविड केअरच व्यवस्थापन अपयशी – आमदार जगताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :-पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज दीड हजारच्या वर रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्षात महापालिका प्रशासन आणि मनपाच्या कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन कमी पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्ण खाजगी कोविड रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. खासगी कोविड रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील सामान्य रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या जीवघेण्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांनी जायचे तरी कुठे?, असा सवाल आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका आयुक्तांकडे केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत शहरातील रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. शहरातील ऑक्सिजन पुरवठादार हे ऑक्सिजनचा साठा असूनही कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तुटवडा असल्याचे सांगून टाळाटाळ करत आहेत. परिणामी ऑक्सिजन अभावी मोठ्या प्रमाणत रुग्ण मृत्यमुखी पडत आहे. ही अतिशय भयानक परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. आम्ही आपणास वारंवार विनवण्या करीत आहोत. परंतु, त्याबाबत महापालिका प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असून आपले सूचना-आदेश न जुमानणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी.
शहरात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. ऑक्सिजन बेड व ICU बेड मिळविण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. शहरात गंभीर, तसेच ऑक्सिजनवर गेलेल्या रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिव्हिर या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे परिणामी रुग्णांसाठी ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरात मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडल्याने रेमडेसिव्हीरचा काळाबाजार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दक्षता घ्यावी. तसेच संबंधित कंपन्यांकडून त्याचा पुरवठा सुरळीत करून साठेबाजी रोखण्यात यावी.
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्व कोविड रुग्णालयातील रुग्णांना ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठादार, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकारी व माझे प्रतिनिधी समवेत तातडीने संयुक्त बैठक घेणेकामी आपल्या स्तरावरून तात्काळ संबंधितांना आदेश निर्गमित करावे.