- घरातून दारूची विक्री करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- घरात विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या बाळगून त्याची विक्री करत असलेल्यांना पोलिसांनी पकडले. यावेळी आरोपींनी पोलिसाची गचांडी पकडून दमदाटी केली. कारवाई करू नये म्हणून पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
मूळचे नेपाळ येथील असलेल्य सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्राधिकरण निगडी येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. करण भरत सोनार (वय २३), अर्जुन भरत सोनार (वय २०), दिपेश भरत सोनार (वय १९), भरत अमर सोनार (वय ४५), मनीषा भरत सोनार (वय २२), गीता भरत सोनार (वय ४०, सर्व रा. प्राधिकरण निगडी, मूळगाव मोगलसेन, जि . आच्छाम, नेपाळ, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संगनमत करून राहत्या घरामध्ये विदेशी दारू व बिअरच्या ९७ हजार १४५ रुपये किमतीच्या ५१८ बाटल्या जवळ बाळगून त्याची लोकांना विक्री करत होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपींना पकडले. पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून आरोपी करण सोनार याने फिर्यादी सतीश ढोले यांची गचांडी पकडली. इतर आरोपींनी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. कारवाई करू नये म्हणून आरडाओरड व गोंधळ करून पोलिसांशी झटापट केली. सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.