- वाकड, ताथवडे परिसरात दोन मालवाहतूक टेम्पो चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- घरासमोर पार्क केलेला मालवाहतूक टेम्पो चोरून नेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना जेएसपीएम कॉलेज अशोकनगर झोपडपट्टी, ताथवडे येथे मंगळवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली. तर दुसरी घटना शेख वस्ती वाकड येथे बुधवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.
पहिल्या घटनेत अशोक कुंडलिक वाघ (वय ३७, रा. अशोकनगर झोपडपट्टी, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याकडे अशोक लेलंड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो (एमएच – १४ – जीडी -८११४) आहे. तो टेम्पो त्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केला. रात्री चोरट्यांनी त्यांचा टेम्पो चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.
दुसऱ्या घटनेत सखाराम गुलाब शिंदे (वय ४१, रा. शेख वस्ती, वाकड) यांनी चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिंदे यांचा तीन लाख ८० हजार रुपये किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा दोस्त प्लस मालवाहतूक टेम्पो (एमएच – १४ ईएम -५५९७) मंगळवारी सायंकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.