- वायसीएमसह शहरातील कोविड सेंटरला आयुक्तांचे फर्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड १९ विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये देखील बेड्सची संख्या कमी पडत आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांस कोणत्याही वेळी प्रकृती खालावल्यामुळे कोविड केअर सेंटर अथवा इतर खाजगी रुग्णालयामधून ऑक्सीजन अथवा आयसीयु बेडकरिता वाय.सी.एम.रुग्णालय अथवा आयसीयु सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयामध्ये स्थलांतरित करावे लागते. परंतु ऑक्सीजन अथवा आयसीयु बेडची संख्या मर्यादित असल्यामुळे रुग्णांना अनेकदा बेड उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
तसेच ऑक्सीजन बेड्स तातडीने उपलब्ध न झाल्याने रुग्णांची स्थिती अधिक खालावल्याची परिस्थिती निर्माण होते. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना देखील ऑक्सीजनची आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयामध्ये ऑक्सीजन बेड उपलब्ध होईपर्यंत आहे त्याच स्थितीमध्ये ठेवणे भाग पडते. तसेच कोविडची बाधा झालेले रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आले असता काही रुग्णांना तातडीने ऑक्सीजन उपलब्ध करणे आवश्यक असते, असे रुग्ण संदर्भित करण्यापूर्वी त्यांना त्याच ठिकाणी ऑक्सीजन उपलब्ध करुन दिल्यास भविष्यात उद्भवणारी गुंतागुंतीची परिस्थिती टाळणे शक्य होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीने ऑक्सीजन बेड उपलब्ध होण्यासाठी मनपाच्या कोविड केअर सेंटरमधील काही बेड्स हे ऑक्सीजन बेड्स म्हणून कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
त्याकामी बालनगरी (भोसरी) येथे १० बेड्स, क्रिडा संकुल (बालेवाडी) येथे ०६ बेड्स, घरकुल (चिखली) येथे ०६ बेड्स हे ऑक्सीजन बेड्स म्हणून कार्यान्वित केल्यास अत्यावस्थ होणा-या रुग्णांना आयसीयु बेड उपलब्ध होईपर्यंत त्याठिकाणी ऑक्सीजन पुरवठा केल्यास रुग्णाची स्थिती खालावण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये जंबो सिलेंडर उपलब्ध आहेत. जंबो सिलेंडरचा वापर कोविड केअर सेंटर येथे करणे शक्य आहे. यास्तव वाय.सी.एम.रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेले जंबो ऑक्सीजन सिलेंडर आवश्यक संपूर्ण ऍक्सेसरीज वरील तिनही कोविड केअर सेंटर येथे उपलब्ध करणे व ऑक्सीजन सिलेंडरचा आवश्यकतेनुसार पुरवठा करणेकरिता संबंधित पुरवठादारास निर्देश देणे आवश्यक राहील.
कोविड केअर सेंटर येथे ऑक्सीजन बेड्स उपलब्ध करणे व ते सर्व ऍक्सेसरीज सह कार्यान्वित करण्याचे कामकाज हे बायोमेडिकल इंजिनियर यांचेमार्फत होणे आवश्यक आहे. तसेच सदर ऑक्सीजन सिलेंडर बसविल्यानंतर कोविड केअर सेंटरमधील कर्मचा-यांना रुग्णांस ऑक्सीजन देण्याकरिता आवश्यक असलेले प्रशिक्षण देखील बायोमेडिकल इंजिनिअर यांचेमार्फत देणे आवश्यक आहे.
आयुक्तांनी एकूण २२ ऑक्सीजन बेड्स उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. बायोमेडिकल इंजिनिअर यांचेमार्फत ऑक्सीजन बेड्स उपलब्ध करणेकामी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी व संबंधितांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. तसेच अधिष्ठाता, वाय.सी.एम.रुग्णालय यांचेमार्फत संबंधित पुरवठादारास आवश्यक ते निर्देश देऊन आवश्यकतेनुसार ऑक्सीजनचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्याची कार्यवाही करावी, असा आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिष्ठाता, पीजी इन्स्टीट्युट, वाय.सी.एम.रुग्णालय, कोविड केअर सेंटर, बालनगरी (भोसरी), कोविड केअर सेंटर, क्रिडा संकुल (बालेवाडी), कोविड केअर सेंटर, घरकुल (चिखली) यांना दिला आहे.