- इंडियन मेडीकल असोसिऐशन व पालिकेचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोविड १९ विषाणूची बाधा झालेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या नागरिकांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणेकरिता इंडियन मेडीकल असोसिऐशन, पिंपरी – चिंचवड – भोसरी शाखा यांचे पदाधिका-यांची पालिका आयुक्त यांचेसमवेत दि. ५ / ०४ / २०२१ रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार इंडियन मेडीकल असोसिऐशनमार्फत आयुक्तांकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून त्यानुसार इंडियन मेडीकल असोसिऐशन, पिंपरी – चिंचवड – भोसरी शाखेचे सदस्य असलेल्या डॉक्टरांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येऊन अशा डॉक्टरांमार्फत रुग्णांची दैनंदिन तपासणी करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्याकरिता सर्वप्रथम कोविड १९ विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांस १ वेळा पॅनलवरील खाजगी वैद्यकीय अधिका-याकडे भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रुग्णांस गृहविलगीकरणाचा सल्ला अथवा रुग्णालयामध्ये दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
तसेच गृहविलगीकरणासाठी निर्देशित केल्यानंतर रुग्णांस संबंधित डॉक्टरांनी सुचविलेल्या तपासण्या करुन प्राप्त रिपोर्टप्रमाणे वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्यात येईल. तसेच उपचार कालावधीमध्ये संबंधित रुग्णामार्फत दररोज डॉक्टरांशी दुरध्वनीद्वारे कन्सल्टेशन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
या सुविधेकरिता प्रति रुग्ण र.रु .१०,००० / – इतके शुल्क रुग्णांस अदा करावे लागेल. तसेच हा खर्च बँक ट्रान्सफर अथवा युपीआय पेमेंट पध्दतीने अदा करणे आवश्यक राहील असेही नमूद करण्यात आलेले आहे. तथापि, गृहविलगीकरणातील रुग्णास सदर कालावधीदरम्यान रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास महापालिकेमार्फत पॅनलवरील वैद्यकीय अधिका-यास संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असून सदर रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आवश्यक ती सुविधा पुरविण्याची कार्यवाही क्षेत्रीय रुग्णालयांमार्फत करण्यात येणार आहे.
इंडियन मेडीकल असोसिऐशन, पिंपरी – चिंचवड – भोसरी शाखा यांचेमार्फत पॅनलवरील ४५ वैद्यकीय अधिका-यांची यादी सादर करण्यात आलेली असून गृहविलगीकरणासंबंधी रुग्णासाठी व काळजीवाहकासाठी सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. तसेच रुग्णाच्या आरोग्य स्थितीची नोंद ठेवण्याकरिता चार्ट देखील सादर करण्यात आलेला आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इंडियन मेडीकल असोसिऐशन, पिंपरी – चिंचवड – भोसरी शाखा यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क करावा. तथापि, ही सुविधा पूर्णत: ऐच्छिक स्वरुपाची असून नागरिकांच्या सोईसाठी महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा भाग आहे. त्यामुळे पॅनलवरील वैद्यकीय अधिका-यांसाठी निर्धारित केलेले शुल्क भरावयाची जबाबदारी संबंधित नागरिकांची राहील.