- महाविकास आघाडीलाही बँकेचा तिढा सोडण्यात अपयश?
- आरबीआयने बँकेच्या निर्बंधांची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२१) :- रुपी को- ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची ३१ मे अखेर असलेली मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवून ती ३१ ऑगस्टपर्यंत करण्यात आल्याची माहिती बँकचे प्रशासक सुधीर पंडित यांनी दिली. बँकेचा परवाना रद्द करून बँक अवसायनात गेल्यास ९९ टक्के ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे मिळू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
रुपी बँक गेली पाच वर्षे सातत्याने परिचलनात्मक नफा मिळवत आहे. तथापि, होणाऱ्या नफ्याचे प्रमाण बँकेच्या उणे नक्त भांडवली मूल्य ५४० कोटी रुपये या आवश्यकते इतके कमी करण्यास पुरेसे नाही. पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. बँकेचा परवाना रद्द करून बँक अवसायनात गेल्यास ९९ टक्के ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे मिळू शकतात. मात्र, एक टक्का ठेवीदारांचे ६५ टक्के नुकसान होऊ शकते.
रिझर्व्ह बँक ठेवीदारांचे हित संरक्षण करण्यासाठी सकारात्मकविचार करू शकते. योग्य वाटल्यास काही निकषांवर रिझर्व्ह संबंधित बँकेस अथवा रुपी बँकेस दीर्घ मुदतीने भांडवली निधीही देऊ शकते, असे पंडित यांनी सांगितले.