- पुढील आठवडाभरात होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२१) :- महापालिकेच्या ऑनलाइन शाळांची मंगळवारी (दि. १५) पहिली घंटा वाजली. परंतु, शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्याच्या शिक्षणासाठी मोबाइल, टॅब नाही. अशा विद्यार्थ्यांना महापालिका कृतीपत्रिका देऊन त्यांच्याकडून ऑफलाइन अभ्यास करून घेणार आहे. त्यासाठी अशा मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यांना गतवर्षी कृतीपत्रिका देऊन त्यांचा ऑफलाइन अभ्यास करून घेण्यात आला होता. यंदाही अशाच पद्धतीने नियोजन केले जाणार आहे.
महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि २८ माध्यमिक शाळांमध्ये मंगळवारपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना त्यासाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. जुना व नवीन अभ्यासक्रम यांचा मेळ घालून शिक्षकांसाठी शासनाचा ब्रिज कोर्स तयार करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर ग्रुपमध्ये अॅड करून नव्याने ग्रुप तयार केले जात आहे. ज्या शाळांमध्ये ऑनलाइन सेटअप ‘ तयार आहे, तेथे झुम अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, ज्या शाळांमध्ये ही सुविधा नाही, तेथे व्हिडिओ, ऑडिओ आणि मोबाईल संदेशाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.