- इमारतीवरून उडी मारून दोघांनी संपविली जीवनयात्रा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जून. २०२१) :- चिखली परिसरातील घरकुल येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थीने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान चिखली घरकुल येथेच आणखी एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना सोमवारी (दि. २१) सकाळी घडली होती.
रवीकुमार अलाप्पा बलीजा (वय २०, रा. इमारत क्रमांक एफ २१, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला रवीकुमार बलीजा हा घरकुल येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यास होता. तो राहत असलेली इमारत सात मजल्यांची असून, त्या इमारतीच्या टेरेसवर काही जण नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जातात. त्यानुसार रवीकुमार हा रविवारी सायंकाळी इमारतीच्या टेरेसवर व्यायामासाठी गेला.
त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास टेरेसवरून त्याने उडी मारली. त्याच्या घरच्यांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.