- पुणे आर्मी रिक्रूटमेंट अंतर्गत नगरमध्ये मोठी लष्कर भरती..
- ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- पुणे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लष्कर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इ. ८ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवाराना मोठी संधी उपलब्ध आहे. ही भरती प्रक्रिया ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी पार पडणार आहे. यासाठी ९ जुलै ते २२ ऑगस्ट या दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावयचे आहे. अॅडमिट कार्ड २४ ऑगस्टनंतर उपलब्ध होणार आहे.
या भरतीमध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर जनरल ड्यूटी ट्रेड्समैन या पदांसाठी अर्ज करता येईल. तर ८ वी उत्तीर्ण उमेदवारांना ‘ ट्रेड्समन ‘ मधील मेस किपर, हाऊस किपर यांसारख्या पदांकरिता अर्ज करता येईल. याशिवाय १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना सोल्जर टेक्निकल, सोल्जर नर्सिंग असिस्टंट आदी पदांसाठी अर्ज करता येईल. या भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक मोजमापे घेतली जातील व त्यानंतर १०० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १६०० मीटर धावणे व पुलप्स हे दोन प्रकार असणार आहेत. याशिवाय ९ फुट खड्डा पार करणे व निमुळत्या झिगझ्याक फळीवरून तोल संभाळत चालणे या प्रकारांचा समावेश असणार आहे.
शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या वैद्यकीय चाचणीत दृष्टिदोष, शारीरिक व्यंग इत्यादी तपासण्या केल्या जातील. शारीरिक क्षमता व वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून लेखी परीक्षा घेतली जाईल. शेवटी मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची अतिम निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे अॅडमिट कार्ड, फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, जात व धर्म प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.