- २१ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत परीक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारीख आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांना २० जुलै (उद्या) सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असतो.
जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हॉल तिकीट देखील ऑनलाईन मिळणार आहेत. १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.