- तिरुपती, शुभम व परफेक्ट फॅसिलिटीकडे कामाची जबाबदारी..
- पालिका आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते व गटार साफसफाईचे काम गेली साडेतीन वर्षापासून करीत असलेल्या गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चरचा ठेका रद्द करत त्याचे काम इतर ठेकेदारांना देण्यात आले आहे. सफाई कामगारांचे वेतन लाटल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी ही कारवाई केली. तसेच , ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या इन्फ्रास्ट्रक्चरला फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रस्ते व गटर साफसफाईचे काम १८ डिसेंबर २०१७ ला २ वर्षासाठी देण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. सध्या तो ठेकेदाराच काम करीत आहे. ठेकेदाराकडे असलल्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता अर्धे वेतन देणे, कामगारांचे एटीएम व बँक पासबुक स्वत:कडे ठेवणे, कामगारांना दोन महिने वेतन न देणे, वेतन मागितल्यास किंवा तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत होती. तसेच, सफाईचे कामकाज व्यवस्थित होत नव्हते, आदींसह असंख्य तक्रारीं कामगारांनी आरोग्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयाकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन आयुक्त पाटील यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. तक्रारदार कामगारांचे लेखी जबाब व्हिडिओ रेकॉर्डींगद्वारेही घेण्यात आले. चौकशीमध्ये गैरव्यवहार उघड झाला. कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे आयुक्तांनी गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चरवर कारवाई करीत त्याचा ठेका रद्द केला.
कामकाजात खंड पडू नये म्हणून फ क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज तिरूपती इंडस्ट्रीअल सर्व्हिसेसकडे, ग क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज शुभम उद्योग आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज परफेक्ट फॅसिलिटी सर्व्हिसेसकडे सोपविण्यात आले आहे. तसेच, गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चरच्या १५ अधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.