- विनामास्क कारवाई दरम्यान इसमाची पोलिसांवर दादागिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- वाहतूक नियमनाचे तसेच विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे काम सांगवी वाहतूक विभागाच्या महिला पोलीस नाईक करत होत्या. दरम्यान आरोपी त्याच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच १२ / एल एन ७२४५) विनामास्क येताना दिसला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला थांबवून विनामास्कची पावती करण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी याने फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेला शिवीगाळ केली.
तसेच ‘मी पावती करणार नाही. तुला काय करायचे ते तू कर. माझ्याकडे रोज पन्नास पोलीस येतात’, असे बोलून कामात अडथळा आणला. तसेच फिर्यादी यांचे सहकारी पोलीस शिपाई पाटील यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
ही घटना गुरुवारी (दि. २९) सायंकाळी सहा वाजता रहाटणी फाटा येथे घडली. महिला पोलीस नाईक रोहिणी सूर्यवंशी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू प्रकाश भाटी (वय ३६, रा. उषा मनोहर सोसायटी, औंधगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.