- देहूरोड पोलीस ठाण्यात देशी फळझाडांच्या लागवडीने “हरित वारीची” सांगता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाची हरित वारी मोजक्याच वृक्षमित्रांच्या सहभागाने देशी फळझाडांच्या लागवडीने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २०) रोजी पूर्ण करण्यात आली.
जांभूळ, चिंच, आंबा, आवळा, तुती या पक्ष्यांना प्रिय असणाऱ्या फळझाडांचे रोपण देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर व पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला प्रमुख अर्चना घाळी दाभोळकर, संतोष चव्हाण, राजू येळवंडे, बाबासाहेब घाळी, संदीप सकपाळ, लक्ष्मण इंगवले, सुरेश गावडे, ओंकार पाटील, अमोल कानू, तेजस सापरिया, समीर चिले, मंगेश घाग, शशिकांत इंगळे उपस्थित होते.
या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे म्हणाले, “संतांची पावन भूमी असलेल्या देहू आळंदी परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून हरित वारी करत आहे. आपल्या शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हरित वारीच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यामुळे भविष्यात नक्कीच ऑक्सिजनची पातळी वाढलेली दिसेल. दरवर्षी देहूरोड पोलिस ठाणे या पवित्र सामाजिक उपक्रमात सहभागी असणार यात शंका नाही.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” हरित वारी उपक्रमामुळे दर वर्षी समितीच्या वतीने विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात येते. कोविड संक्रमानामुळे जगतगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराज पालखी पायी वारी करणे वैष्णवांना गेल्या दोन वर्षांपासून शक्य होत नाहीये. अश्या परस्थितीत वृक्षारोपण करून ‘हरित वारी’पूर्ण करताना समितीच्या वृक्ष मित्रांना आनंद होत आहे. सांगता समारोप करताना देहूरोड पोलीस ठाणे परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.