- फसव्या पतीकडून महिलेकडे आणखी पैशांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२१) :- जीवनसाथी डॉट कॉम या विवाह नोंदणी संकेतस्थळावर फिर्यादी आणि आरोपीची ओळख झाली. आरोपीने फिर्यादी सोबत लग्न करतो, असे सांगून दोन ते तीन महिने फोनवर बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीला पैशांची गरज आहे, असे खोटे सांगून फिर्यादीकडून ११ लाख चार हजार पाचशे रुपये घेतले.
लग्न करण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांना चेन्नई येथे बोलावून घेतले. खोटे बोलून फिर्यादीच्या लग्नाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादी यांना लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवून तू माझी पत्नी झाली आहे, मला व्यवसायासाठी ८० लाख रुपये कर्ज तुझ्या नावावर काढून दे, अशी आरोपीने मागणी केली.
फिर्यादी यांनी त्यास कर्ज काढून देण्यास नकार दिला, त्यावरून आरोपीने पीडीतेच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २७ एप्रिल २०२० ते ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीत संभाजीनगर चिंचवड येथे घडला. पीडित महिलेने रविवारी (दि. १२) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेमराज थेवराज (रा. सिव्हिलायझेशन कॉलनी, नगनलू पार्ट १, चेन्नई, तामिळनाडू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.निगडी पोलीस तपास करीत आहेत.