- शहर मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांचे आयुक्तांना निवेदन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२१) :- यमुनानगर येथील सद्गुरु दत्त उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे (क्लब हाऊस) स्व. प्रवीण खिल्लारे व स्व. सिताराम धोंडु रहाटे असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता सचिन चिखले यांनी पालिका आयुक्तांकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नियाज भाई खान, जय सकट, रुपेशभाऊ पटेकर, पप्पु शिंदे, मगेश गायकवाड, किसन हडे आदी उपस्थित होते.
निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील यमुनानगरमधील सद्गुरु दत्त उद्यानात महापालिकेच्या वतीने विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या भागात विरंगुळा केंद्र व्हावे, यासाठी कै. सीताराम रहाटे आणि कै. प्रवीण खिल्लारे यांनी मोठे योगदान दिले आहे. जेष्ठांची मोट बांधून त्यांना एकत्र आणले. हे कार्य करीत असतानाच रहाटे यांचे २०१७ मध्ये निधन झाले तर, प्रवीण खिल्लारे यांना करोना काळामध्ये सामाजिक कार्य करीत असतांनाच देवाज्ञा झाली. सामाजिक क्षेत्रात या दोन्ही जेष्ठांचं काम वाखाणण्याजोगं होतं. या दोन्ही व्यक्ती आमच्यासाठी व समाजातील सर्वच स्तरासाठी प्रेरणादायी आहेत.
यासह या विरंगुळा केंद्रातील दर्शनी भागात दोन सभागृह आहेत. यात खाली असणाऱ्या सभागृहास कै. प्रकाश आप्पा काळभोर व वर असणाऱ्या सभागृहास कै. शशिकांत दिगंबर गडवे, असे नाव देण्यात यावे, अशी यमुनानगर परिसरातील जेष्ठ नागरिकांची मागणी आहे. आयुक्तांनी या मागणीची दखल घेऊन तात्काळ नामकरणाचा ठराव मंजूर करावा. जेणेकरून प्रभागातील नागरिकांना या सद्विवेकी व थोर पुरुषांचे कार्य त्यांच्या नावारूपाने कायम समरणात राहील, असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.