- तरुणीकडून गुन्हा दाखल; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने ३० वर्षीय तरुणी भावासह घरी जात असताना अश्लिल शेरेबाजी करत बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना वाकडमध्ये घडली आहे.
फिर्यादी तरुणी आणि तिचा भाऊ चायनीज विकण्याचा गाडा चालवून पोट भरतात. रात्री उशिरा त्यांचा गाडा बंद होतो. सोमवारी मध्यरात्री पाऊणेबाराच्या सुमारास भाऊ आणि बहीण दोघे ही घराच्या दिशेने चालत जात होते. रात्री उशीर झाल्याने कुत्रे भुंकत होते म्हणून भाऊ कुत्र्यांना हकलवत पुढे चालत होता. तेवढ्यात, अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने तरुणी एकटी असल्याच पाहून बेसावध तरुणीच्या जवळ येत अश्लील शेरेबाजी केली.
दुचाकीवरूनच एका हाताने मिठी मारून गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लीश चाळे करण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या भावाला पाहताच फूड डिलिव्हरी बॉय तिथून फरार झाला आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे. वाकड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.