- पिंपरी चिंचवड शहरात पहिल्या बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या बालस्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन निगडी पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी (दि. १५) करण्यात आले. बालकांच्या संदर्भातील सर्व प्रकारचे गुन्हे आणि पोलीस ठाण्यातील प्रक्रिया बालस्नेही पद्धतीने करण्यासाठी तसेच पोलीस ठाण्याच्या कोणत्याही कार्य पद्धतीचा बालकांवर दबाव येऊ नये यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
याप्रसंगी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस डॉ. आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, शंकर आवताडे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका शर्मिला बाबर, अतुल शितोळे, होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनचे कॅरोलिन ओज्वा द वॉल्टर, बी जी शिर्के कंपनीचे लमाण, चव्हाण आदी उपस्थित होते.
बालकांचे हक्क आणि त्यांच्या समस्यांबाबत काम करण्यासाठी या अनोख्या बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे वातावरण बालस्नेही करणे, भरकटलेल्या बालकांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा कक्ष प्रयत्न करणार आहे. पुढील काळात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातही असे बालस्नेही पोलीस कक्ष तयार केले जाणार आहेत.