- आ. लक्ष्मण जगताप यांचे जिल्हाधिकारी देशमुख यांना निवेदन...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२१) :- ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीमध्ये समाविष्ट होणाऱ्या नागरिकांची नावे आपल्या जवळच्या बूथमध्ये न येता प्रभागात किंवा मतदार संघात इतरत्र बूथमध्ये समाविष्ट होत आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष घरापासून लांब असलेल्या बूथवर किंवा इतरत्र प्रभागात मतदानाकरिता जावे लागते. परिणामी अनेक नागरिक मतदान करण्यास जात नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होत आहे. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाच्या nvsp.in या संकेतस्थळावर बदल करण्याबाबत NIC व निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करण्यात यावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की. ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेत नाव नोंदणी करताना नागरिकांचे नाव घराशेजारील बूथमध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑनलाईन पोर्टल nvsp.in या संकेतस्थळावर त्या बूथमधील इतर मतदाराचा किंवा मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबातील बूथ क्र. आणि मतदान केंद्र नमूद करण्याचा पर्याय उपलब्ध केल्यास नव्याने नोंदणी करणाऱ्या मतदाराचे नाव घराशेजारी जवळच्या बुथवरील मतदान केंद्रावर समाविष्ट होईल. तसेच भौगोलिकदृष्ट्या जवळच्या मतदान केंद्रावर नाव सामविष्ट झाल्यास निवडणूक काळात BLO, BLA व निवडणूक कर्मचाऱ्याना मतदारांना घरोघरी मतदार स्लीप पोहचविणे सोयीचे होईल.
लोकशाहीच्या या उत्सवात ‘संकल्प माझा मतदानाचा, मी मतदान करणारच’ या निवडणूक आयोगाच्या घोषवाक्याचा खऱ्या अर्थाने सार्थक होऊन मतदान टक्केवारीत वाढ होण्यास मदत होईल. सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट सफल होईल. लोकशाही व्यवस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणाबरोबरच मतदाराला आपल्या भागातील लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकरिता मतदाराचे नाव स्वत:च्या परिसरातील नजीकच्या मतदान केंद्र व बूथवर समाविष्ट झाल्यास निवडणूका पार पडणे सोयीचे होईल व भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल, असे या निवेदनात आ. जगताप यांनी म्हटले आहे.