- पहिल्याच दिवशी पालिकेकडून ३५ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- महापालिकेच्या जागेत बेकायदेशीररित्या ११८ अनधिकृत जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. अशा होर्डिंग्जच्या विरोधात महापालिकेने मंगळवारपासून (दि. २१) कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी पालिकेच्या पथकाने ३५ अनधिकृत होर्डिंग काढून जप्त केले, अशी माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
शहरात सुमारे हजारांहून अधिक होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी केवळ ५०० होर्डिग्ज अधिकृत आहेत. मात्र, उर्वरित खासगी जागेत उभारलेले होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. पालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने सर्व होर्डिंग्जचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
पहिल्या टप्प्यात पालिकेच्या जागेवरील अनधिकृत होर्डिग्जचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्रकाशित (एलईडी व दिव्याचे १२१ आणि अप्रकाशित २ हजार १३) होर्डिंग्ज अधिकृत होते. या व्यतिरिक्त पालिकेच्या एकूण १०९ जागांवर बेकायदेशीररित्या ११८ अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आल्याची बाब सर्वेक्षणात समोर आली आहे. होर्डिंग उभारणाऱ्यांना नोटिसीचा इशारा दिला होता. नियमानुसार संबंधित होर्डिंग्ज उभा करणारे, तसेच त्यावर जाहिरात असणारे व्यक्ती, संस्था यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.