- तर, भोसरी मतदार संघात सर्वात कमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना छायाचित्र देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३ विधानसभा मतदार संघातील तब्बल १८ हजार ६० मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याने संबंधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र न दिल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदार महापालिका निवडणुकीतील मतदानाला मुकण्याची शक्यता आहे.
चिंचवड मतदार संघातील ५७६६, पिंपरी मतदार संघातील दहा हजार ५३४ आणि भोसरी मतदार संघातील १७६० अशा तीन मतदार संघातील १८ हजार ६० मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यात आलेले नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत केली जात आहे. प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर्स हेल्पलाइन’ या मोबाइल उपयोजनवर (अॅप) समजेल. मतदार यादीत छायाचित्र नसल्यास याच संकेतस्थळावर किंवा वोटर्स हेल्पलाइन अॅपवर अर्ज क्र. आठ भरावा, मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. सहा, तर वगळण्यासाठी अर्ज क्र. सात भरावा असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.