- महापौर माई ढोरे यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील तरुणी व महिलांच्या बाबतीत घरगुती हिंसा व इतर दुर्देवी घटनासंबंधी विविध उपाययोजना तत्काळ करा. महिलांशी संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे गुरुवारी (दि. २३) केली. महापौर ढोरे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली.
महापौर ढोरे म्हणाल्या, शहरातील स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या दुर्देवी घटना तसेच, वाढत्या गुन्हेगारीमुळे तरुणी व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरातील काम करणाऱ्या महिलांना तसेच, विविध कामासाठी वेळी – अवेळी बाहेर पडावे लागते. महिलांशी संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्याव्यात.
यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, भाजप प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, नगरसेविका उषा मुंडे, उज्वला गावडे, कविता हिंगे, गीता महेंद्र, शोभा भराडे, आशा काळे, पल्लवी वाल्हेकर, सोनम मोरे, वैशाली जवळकर आदी उपस्थित होत्या.
महिलांवरील अन्यायासंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील महिलांनीही न घाबरता तक्रार केल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगितले. काही महिला हया भितीपोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. महिलांनी न घाबरता अन्यायाविरुद्ध तक्रार करावी. त्यामुळे पोलिसांना संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करता येईल, असे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.