- उपचारासाठी पैशांची मागणी; मात्र, भलतेच सत्य झाले उघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ८३२९७७३२०४/ ७२१८१७५५३९ या फोन क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने ‘मुलीचे नाव घेऊन तिच्या डोक्यावरून ट्रक गेला असून तिला उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.
कांबळे हे त्यावेळी एका कार्यक्रमात व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी फोनवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पत्नीला ही हकीकत सांगितली. त्यानंतर कांबळे यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईल फोनवरून गुगल पेच्या माध्यमातून आरोपीच्या वरील मोबाईल क्रमांकावर सहा हजार ५०० रुपये पाठवले. आरोपीने कांबळे यांच्याकडे आणखी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे कांबळे समक्ष वायसीएम हॉस्पिटलमध्ये गेले आणि फोनवरील व्यक्तीने सांगितलेल्या भाग्यश्री बाविस्कर नावाच्या रुग्णाबद्दल चौकशी केली.
त्यावेळी अशा नावाचा कोणताही रुग्ण रुग्णालयात नसल्याची माहिती कांबळे यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.