- नागरिकांकडून कार्यालयात अनागोंदी; ९ फाईली सापडल्याचा प्रशासनाचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेकडून सर्वेक्षणामध्ये नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्यात आला. त्या मिळकतींची नोंद करून त्यांना कर आकारणी करण्याचे काम कार्यालयाकडून सुरू होते.
त्या संदर्भात कर संकलन विभागीय कार्यालयातून मिळकतींच्या एकूण १४ फाईली अचानक गायब झाल्याचे समोर आले. हा प्रकार शुक्रवारी (दि. १) उघडकीस आला. वारंवार चकरा मारूनही कर्मचारी मिळकतीची नोंद करत नसल्याने नागरिकांनी कार्यालयात गोंधळ घातला. पैशांसाठी जाणीवपूर्वक अशी अडवणूक केली जात असल्याचा आरोप काहींनी केला. त्यामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अधिकारी व स्थानिक नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.
पिंपरी कॅम्प कार्यालयातील गडबडीबाबत चौकशी सुरू आहे. सायंकाळी सहापर्यंत १४ पैकी ९ फाईल गोदामात सापडल्या आहेत. उर्वरित फाईल तत्काळ शोधून मिळकतधारकांची समस्या सोडविली जाईल. संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा घेण्यात येणार आहे. तसेच, योग्य ती कारवाई केली जाईल.
– स्मिता झगडे (उपायुक्त – महापालिका, कर संकलन विभाग)