- राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न..
- भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी कॉंग्रेस, शिवसेना, मित्र पक्ष एकत्र येणार?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२१) :- मागील सार्वत्रिक निवडणूकानंतर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपचा उधळलेला वारू राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष एकत्र येऊन रोखू आणि भाजपला सत्तेतून पायउतार करु, असे प्रतिपादन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.
डॉ. कैलास कदम यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डॉ. कदम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी कामगार नेते डॉ. कैलास कदम यांची शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. याचा कॉंग्रेससह समविचारी पक्षांना निश्चितच फायदा होईल, असे ते म्हणाले आहेत.
काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पाहिले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघे एकमेकांशी निधर्मी आघाडी म्हणून बांधलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भरभराटीचे दिवस दाखवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात या शहराला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता स्थापन केली. तरीदेखील काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत या शहरात मित्र पक्ष म्हणूनच काम केले आहे.
सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रपणे मित्र पक्ष म्हणून काम करत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ‘हिट’ ठरला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढली हा प्रयोग यशस्वी झाला. त्याचप्रमाणे आता तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबवण्याची चाचपणी सुरू आहे. याबाबत अद्याप खात्रीलायक सांगता येणे शक्य नसले. तरीही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी करून निवडणुका लढविणे आणि भाजपचा उधळलेला वारू रोखण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही संजोग वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केले.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये पक्षीय मतभेद, अंतर्गत वाद, कलह सुरु असताना वाघेरे पाटील यांनी डॉ. कदम यांना दिलेल्या शुभेच्छा म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्याचे संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.