- कनिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या थोबाडीत बुट मारला..
- अतिरिक्त कार्य. अभियंता चौधरी यांच्या मनमानी कारभारामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२१) :- रजेचा अर्ज नामंजूर केल्याच्या कारणावरून निगडी प्राधिकरणातील उपविभागीय विद्युत कार्यालयाच्या दर्शनी भागात सहायक अभियंता श्री अनिल हुलुसुलकर आणि अतिरिक्त अभियंता श्री मिलिंद चौधरी यांच्यात आज तुंबळ हाणामारी झाली. रजा मंजूर झाली की नाही याची विचारणा केल्यामुळे सहाय्यक अभियंता हुलुसुलकर यांनी अति. कार्यकारी अभियंता चौधरी यांची कॉलर पकडून थोबाडीत बुट मारला. दोघांमध्ये शिवीगाळ ऐकून बघ्यांची एकच गर्दी झाल्याने चौधरी यांनी तेथून पळ काढत आपली केबिन गाठली. चौधरी यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत असल्याचे पहायला मिळाले.
याबाबत प्रत्यक्षदर्शी शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे माहिती देताना म्हणाले की, निगडी प्राधिकरणातील उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेले तळवडे येथील सहाय्यक अभियंता अनिल हुलुसुलकर यांना वडील आजारी असल्यामुळे रजा हवी होती. त्यासाठी त्यांनी रजेचा अर्ज केला होता. परंतु, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी बरेच दिवस अर्ज मंजूर केला नाही. रजेचा अर्ज मंजूर करतील अशी हुलुसुलकर यांना अपेक्षा होती. वडील कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पॅरालीसीसचा अटॅक आल्याने त्यांना रजेची आवश्यकता होती. परंतु, चौधरी यांनी खोडा घातल्यामुळे त्यांना गावी जाणे शक्य होत नव्हते. चौधरी यांच्याकडे विनवणी करून देखील त्यांनी अर्ज मंजूर केला नाही. त्यामुळे आज तरी अर्ज मंजूर करतील म्हणून हुलुसुलकर हे चौधरी यांची वाट पाहत कार्यालयाबाहेर उभारले होते. चौधरी कार्यालयात येण्यासाठी गाडीतून खाली उतरले तेवढ्यात त्यांनी रजेच्या अर्जाबाबत त्यांच्याशी विचारणा केली. दरम्यान, दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने हुलुसुलकर यांनी पायातील बुट काढून चौधरी यांच्या थोबाडीत हाणला, असेही ते म्हणाले.
हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांनी एकमेकांवर खालच्या थरातील शिविगाळ केली. त्यामुळे कार्यालयात बिल भरणा व कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांनी भांडण पाहण्यासाठी गर्दी केली. बघ्यांची गर्दी झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत कार्यालयातील आपली केबिन गाठली. त्याच्या पाठोपाठ हुलुसुलकर हेसुद्धा त्यांच्या केबिन कडे धावले. कार्यालयात सुद्धा दोघांमध्ये अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू होती. यावरून चौधरी मनमानीपणे प्रशासकीय कामकाज करत असून कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे, असेही ते म्हणाले.
सहाय्यक अभियंता हुलुसुलकर यांना वर्षापूर्वी कोरोना झाला होता. ते तब्बल एक महिना रूग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान, त्यांनी वैद्यकीय रजेसाठी अर्ज केला होता. त्यावेळी देखील चौधरी यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. तसेच, त्यांच्या वडिलांना पॅरालीसीसचा अटॅक आला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी रजा काढून हुलुसुलकर गावी जाण्याच्या तयारीत होते. परंतु, चौधरी यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची रजा मंजूर झाली नाही. यातून मनस्ताप झाल्याने त्या भांडणाला तोंड फुटले, असेही बोंडे म्हणाले.
मागील दोन महिन्यांपूर्वी देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनवरून कॅप जेमिनी कंपनीस विज पुरवठा का केला? एखादा फिडर बंद झाल्यास नागरिकांना पाच ते सहा तास अंधारात राहावे लागते. प्रभागातील पीएसपी फिडर चार तासापासून का बंद आहे? तो शेलारवस्ती फिडरवर घ्या, अशी मागणी आणि जाब विचारण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे हे कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात आले होते. पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर हेही तेथून जात होते. त्यांच्यासमोरच हे सिनेस्टाईल कृत्य घडले. हा प्रकार या दोघांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी दोघा अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधत, सर्वांना चहा पाजून आपापसातील वाद मिटवण्याच्या सूचना केल्या. घडलेला प्रकार सबंधित वरिष्ठांच्या कानी घातला. पिंपरी चिंचवड इले. काँ. असो. पदाधिकारी नटराज बोबडे, माने, हवालदार, महानगरपालिकेचे इंजिनिअर तसेच महावितरण कंपनीचे देहूरोड सेक्शनचे सहाय्यक अभियंता पुरोहित, देहूगाव सेक्शनचे सहाय्यक अभियंता गौडा, आकुर्डी सब डिव्हिजनचे सहाय्यक अभियंता अमित पाटील, म्हात्रे मॅडम, ढपे मॅडम आणि कार्यालयातील कर्मचारी आदींनी समजूत घातली, अशी माहिती शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे यांनी दिली.