- २४ जणांच्या विरोधात गुन्हा तर एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२१) :- थेरगाव येथील डांगे चौकात राहणाऱ्या व्यक्तींनी ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान फ्लिपकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवरून अॅपल कंपनीचे एअरपोड वायरलेस, वायरसह, चार्जरसह तसेच वन प्लस ब्ल्यूटुथ हेड सेट या वस्तू मागवल्या.
आरोपींनी एकूण चार लाख ९८ हजार रुपयांचे अॅपल कंपनीचे एअरपोड प्रो, वायरलेस चार्जर २० नग, तीन लाख ५७ हजार ६०० रुपयांचे अॅपल कंपनीचे एअरपोडवायर चार्जर २४ नग, ७९ हजार ८४० रुपयांचे वन प्लस ब्ल्यूटुथ हेडसेट १६ नग असे एकूण नऊ लाख ३५ हजार ४४० रुपयांचे साहित्य मागवले. वस्तू मागवून आरोपींनी त्या परत केल्या. कंपनीने आरोपी ग्राहकांना त्यांनी मागवलेल्याच वस्तू दिल्या होत्या, मात्र आरोपींनी मुद्दामहून मागवलेल्या वस्तूंच्या जागी बनावट वस्तू ठेऊन त्या परत केल्या आणि कंपनीची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. २७ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ही घटना घडली.
फ्लिपकार्टकडून गुलाब शंकर काटे (वय ३९, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजू भाई, अनिल रावत, रोहित सोनवणे, पुनित चावळेकर (सौरभ जगदीश नामदेव), इतर २१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुतिन चावळेकर याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.