- राजस्थानमध्ये जाऊन पोलिसांनी आरोपीला घातल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- दसऱ्याच्या दिवशी ज्वेलर्सच्या दुकानातून एक कोटी दहा लाख रुपयांचे सोने घेऊन फरार झालेल्या कामगाराला पोलिसांनी राजस्थानमध्ये सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली. मुकेश तिलोकराम सोलंकी (वय २८, सध्या रा. मोरेवस्ती, चिखली मूळगाव वोपारी, ता. मारवाड, जि पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महावीर ज्वेलर्स या दुकानात कामाला होता. दसऱ्याच्या दिवशी त्याने दुकानातून दोन किलो ४९६ ग्रॅम वजनाचे एक कोटी १८ लाख ६६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुंडाविरोधी पथक समांतर तपास करीत होते. दरम्यान आरोपी चोरी केल्यानंतर दुचाकीवरून वाकड येथील मुंबई बंगलोर महामार्गावर गेला. तेथे दुचाकी लावून तो खासगी बसने बंगलोर येथे नातेवाइकांकडे गेला. त्यानंतर त्याने बंगलोर, कोल्हापूर, पुणे, मुंबई मार्गे राजस्थान गाठले.
गुंडाविरोधी पथकाने त्याचा माग काढत तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर तो त्याच्या मूळगावी गेला. गुंडा विरोधी पथकाने त्याला राजस्थान पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता बुधवार (दि. २७) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी मुकेश याच्याकडून एक कोटी ९ लाख ५२ हजार ८८२ रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.