- पुलाला कठडे नसल्यामुळे नागरिक पुलावरून थेट गाळात; नागरिक गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- जुनी सांगवी-दापोडी येथील पवना नदीवरील जुन्या पुलाला कठडे किंवा सेफ्टी पाईप नसल्यामुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकाचा तोल जाऊन ते खाली खोली नदीत पडून गंभीर जखमी झाले आहेत.
नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यामुळे थेट चिखलात पडल्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाला आणि हाताला मोठी दुखापत झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर मनसे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी जवळच्या स्मशानभुतील कर्मचारी व स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने स्मशानभुमी तील स्ट्रेचर आणून नदीतून त्या व्यक्तीला बाहेर काढले. खूप प्रयत्न केल्यानंतर रुग्णवाहिका घटना स्थळी दाखल झाली.
त्यांनी सांगवी पोलीसांशी संपर्क साधला. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस मार्शल पाठवले. या सर्वांच्या मदतीने त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यक्तीची ओळख पटली असून, विनोद मोरे असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
केवळ पुलाला कठडे नसल्यामुळे ही घटना घडली आहे. पालिकेकडे याबाबत पाठपुरावा करूनदेखील काम करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती सावळे यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना दिली.