- निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे पालिकेचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेत नगरसेवक संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचा नवा सुधारित आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने नव्याने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचे काम सुरू केले जाणार आहे. त्याचे प्रत्यक्ष काम दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २८) स्पष्ट केले.
महापालिकेत १२८ नगरसेवकांची संख्या ११ ने वाढून १३९ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. २७) घेतला आहे. त्यानुसार आता नव्याने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराची प्रभागरचना पुन्हा बदलावी लागणार आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेस मिळणे आवश्यक आहे. त्या आदेशानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे. शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१) साप्ताहिक सुटी आहे. येत्या मंगळवार (दि. २) पासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा आदेश दिवाळीनंतर प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापालिकेच्या स्वतंत्र समितीमार्फत आराखड्याचे काम सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी आहे. एकूण ३ हजार १०२ ब्लॉक (गट) आहेत. एक ब्लॉकमध्ये ४०० ते ८०० लोकसंख्येचा समावेश आहे. ते ब्लॉक जोडून नव्याने प्रभागरचना केली जाणार आहे. नव्या निर्णयामुळे सरासरी ३७ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे.