- मॅटचा निर्णय; ऑगस्ट महिन्यात झाल्या होत्या बदल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीनही निरीक्षकांच्या अन्य ठिकाणी बदली झालेल्या रद्द केल्या आहेत. त्यांना पुन्हा पिंपरी- चिंचवड पोलीस आस्थापनेवर हजर करून घेण्यात आले आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आल्या होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, अमरनाथ वाघमोडे, रंगनाथ उंडे अशी बदलीचे आदेश रद्द झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये वरिष्ठ निरीक्षक पिंजण यांची शिरगाव ते गुन्हे अन्वेषण विभाग तर, सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे आणि गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानविज, अशी बदली झाली होती. त्यानुसार, या तिघांनाही पिंपरी- चिंचवड येथून कार्यमुक्त केले होते. त्यानंतर तिघांनीही ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती.
‘मॅट’ने तिघांच्या बदल्या रद्द केल्या. तसेच, त्यांना पुन्हा पिंपरी- चिंचवड आयुक्तलयात हजर करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पिंजण, उंडे आणि वाघमोडे या तिघांना नियंत्रण कक्ष येथे हजर करून घेण्यात आले.