- सोमनाथ तापकीर युवा मंचचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- कार्तिक शुद्ध द्वादशी…तिन्ही सांजेचा मुहूर्त…‘स्वस्ति श्री गणनायको गजमुखो’…या मंगलाष्टकांच्या स्वरात बाळकृष्णाच्या प्रतिमेसह तुळशीचे लागलेले लग्न….वऱ्हाडी मंडळींनी तुळस आणि बाळकृष्णाला कवठ, आवळा, चिंच आणि फराळाचा नैवेद्य दाखवीत केलेले प्रसाद वाटप…आणि शेवटी महिलांनी एकमेकींची खणा-नारळाने भरलेली ओटी…
निमित्त होते सोमनाथ तापकीर युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे. काळेवाडी येथे हा विवाह सोहळा हजारो वऱ्हाडींच्या उपस्थित मोठ्या थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी बेबीताई मोहन तापकीर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे, ह.भ.प. बाळासाहेब सांगळे महाराज, रुपेश तापकीर, कय्युम शेख, डॉ. शिंदे, प्रवीण झांजे यांच्यासह काळेवाडीतील महिला बचत गटाच्या सदस्या व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, सोमनाथ तापकीर युवा मंचच्या वतीने बेबीताई तापकीर यांच्या हस्ते तुळशी वृंदावनाची सुंदर सजावट करणाऱ्या पाच महिलांना साडी, बाळकृष्णाची मूर्ती व चांदीची वस्तू भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस साडी भेट देण्यात आली.