न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छतेचा इंदौर पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्यासाठी विविध ११ पदांवर १६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या मानधनावर २ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी इंदौर पॅटर्न राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घेण्यात येत असून शहरातील कचराकुंडी हटविण्यात येत आहे.
याशिवाय सध्या अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि की ऑक्सवर धडक कारवाई मोहीमवेगात सुरू आहे. तसेच मोकाट आणि भटके कुत्रे, जनावरे आणि डुकरांवर नियंत्रणासाठी नियोजन करण्यासाठी हे कर्मचारी काम करणार आहेत. या मोहिमेसाठी मनुष्यबळाची कमतरता पडू नये यासाठी या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी चार पशुवैद्यकीय अधिकारी, आठ उद्यान अधिकारी, ३२ कनिष्ठ अभियंता, २० सुपरवायझर, चार परवाना निरीक्षक, १६ निरीक्षक, १६ आरोग्य सहायक, चार लाइव्हस्टॉक सुपरवायझर, चार ॲनिमल किपर आणि ५२ माळी यांची निवड करण्यात आली आहे. ही भरती सहा महिन्यांसाठी असणार आहे. त्यासाठी २२ हजार ८२० ते ४० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.