- प्रदेश काँग्रेसकडून शहराध्यक्षांना स्पष्ट आदेश?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाने स्थानिक पातळीवर कोणत्याही इतर पक्षांशी तडजोड करू नये, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांना दिला आहे.
त्यामुळे येत्या काळात काँग्रेस पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या एकट्याने लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
या संदर्भात पटोले यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना पत्र लिहून याविषयी सूचना केल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे या पत्रात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कोणत्याही तडजोडी करू नये, असे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत.