- शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा..
- अजित पवारांचा हिरवा कंदील?; कार्यकर्त्यात धाकधूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- अध्यक्षपदाची मुदत संपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवीन अध्यक्ष चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतून मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. पक्षांतर्गत बदल केले जात आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसल्याने संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा पक्षाने स्वीकारला नव्हता. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष आणि संपूर्ण समिती बदलली जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान शहराध्यक्ष वाघेरे आणि महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कुणाला मिळणार संधी?
भोसरीतून माजी आमदार विलास लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, चिचवडमधून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, मयूर कलाटे, पिंपरीतून योगेश बहल, मंगला कदम यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी डावलल्याने गव्हाणे यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.