- सांगवीतील घटना; त्या बनावट पोलिसाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत एका तोतयाने एका डॉक्टराची फसवणूक केली. तसेच डॉक्टरांचा मोबाइल हॅक केला. पोलिसांनी या तोतयला अटक केली आहे.
गणेश खोल्लम (रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. कल्पेश ओमकार पाटील (वय ३९, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने डॉक्टरांकडून एक लाख ७५ हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार ७ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत जुनी सांगवी आणि बाणेर येथे घडला.
आरोपी गणेश खोल्लम याच्याकडे बनावट बेडी आणि पोलिसांच्या नावावरुन नाव असलेल्या एका मासिकाचे ओळखपत्र आहे. त्याआधारे त्याने फिर्यादी पाटील यांना सांगवी आणि बाणेर येथील एका हॉस्पिटलमध्ये भेटून आपण पुणे पोलीस दलात गुन्हे शाखा युनिट चार येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. मोबाइल हॅक झाला असून त्यांची माहिती बाहेर जात असल्याची तक्रार आरोपी खोल्लम याच्याकडे केली. खोल्लम याने डॉक्टरांना तुमचा मोबाइल हॅक करण्यामागे राजकारणी, पोलीस व तुमच्या डॉक्टरकी पेशातील वकील काही डॉक्टर यांचा हात आहे. ते तुम्हाला कायमस्वरूपी संपवणार आहेत, असे सांगितले. आरोपीने डॉ. पाटील यांच्या ओळखीतील सात ते आठ लोकांची नावे देखील सांगितली. त्यामुळे फिर्यादी घाबरले. त्यांना घराच्या बाहेर पडायला देखील भिती वाटू लागली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी आरोपीने वेळोवेळी एकूण एक लाख ७५ हजार रुपये घेतले आणि डॉक्टरांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून घाबरवित राहिला. आरोपी तोतया असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.