- ड्रेनेज लाइन व इलेक्ट्रिक मेन केबलची तोडफोड; अध्यक्षाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२१) :- सोसायटीच्या वीजपुरवठ्याची मुख्य केबल आणि ड्रेनेज लाइन जेसीबीच्या साह्याने तोडली. या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रावेत येथे रविवारी (दि. २८) सकाळी ही घटना घडली.
जगन सुभाष माळी (वय ४३ रा. सिल्वर पाम, बीआरटी रोड, रावेत) यांनी रविवारी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली. शिवराज पंडित भोंडवे (रा. रावेत) आणि जेसीबी चालक नीलेश मच्छिंद्र शेलार (रा. विकासनगर, देहूरोड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिल्व्हर पाम या सोसायटीचे अध्यक्ष आहेत. संबंधित बिल्डरने सोसायटी बांधली. या जागेवरून बिल्डर आणि आरोपी यांच्यात जागेच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी आरोपी भोंडवे हे जेसीबी चालक आरोपी शेलार याला घेऊन सिल्व्हर पाम सोसायटीजवळ आले. त्यांनी सोसायटीतील सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, सोसायटीची ड्रेनेज लाइन व इलेक्ट्रिक मेन केबल काहीही कारण नसताना तोडून टाकली. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले, असे फिर्यादीत नमूद आहे.