- कोरोनाचं संकट परतवून लावण्याची वारकऱ्यांची साद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- श्री क्षेत्र देहूगाव येथे आलेले वैष्णव भाविक जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहण्यासाठी आळंदीकडे मार्गस्थ झाले. काही भाविकांनी माउलींच्या दर्शनानंतर श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या परतीच्या वैष्णभक्तांच्या हरिनामाच्या गजराने प्रवासाला सुरुवात केली. यामुळे सारा देहूगाव परिसर व इंद्रायणी नदीकाठ दुमदुमून गेला होता.
दरवर्षी कार्तिक वारीनिमित्त परिसरातील भाविकांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकरी भाविकांनी भल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मुख्य मंदिरातील मुख्य पुजारी धनंजय मोरे यांनी काकडारती केली. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील महापूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर विश्वस्तांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिलामंदिर, तपोनिधी नारायण महाराज व वैकुंठगमन मंदिरात महापूजा करण्यात आल्या. महापूजेनंतर सर्व मंदिरामध्ये लगेचच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले होते. देहूगावासह विठ्ठलनगर, माळीनगर झेंडे मळा, काळोखे मळा, येलवाडी सांगुर्डी या भागांतील स्थानिक भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर परिसरात सकाळपासूनच गर्दी होती. दुपारी आकाश ढगाळ होऊन काही पावसाच्या हलक्या सरीही पडल्या.
येथील भिंतीवर लावण्यात आलेली श्री. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील शिल्पे पाहत भाविकांनी दर्शन घेतले. या ठिकाणी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. बाह्रावळण मार्गाने अवजड वाहतूक वळविल्याने गावात वाहतुकीची कोंडी झाली नाही. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मंदिराच्या परिसरात पोलीस बंदोबस्तही चांगला होता. महसूल विभागाच्या मंडलाधिकारी शेखर शिंदे व तलाठी अतुल गीते व यांनी नदीच्या घाटाची पाहणी केली.