- पहाटेच्या वेळेस वाहनातून पेट्रोल चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिकांकडून बेदम चोप..
- चिंचवडेनगरच्या जय गणेश कॉलनीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२१) :- चिंचवडेनगर परिसरात पहाटेच्या वेळी गाड्यांमधून पेट्रोल चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पेट्रोलची चोरी करून पलायन करताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला वाढलेल्या पेट्रोलच्या किमती आणि चोरी झालेले पेट्रोल या दोन्ही बाजूंनी झळ बसत आहे.
या घटनेत मात्र, मोटारसायकलमधून पेट्रोलची चोरी करुन पोबारा करण्याच्या तयारीत असताना चक्क चोरट्यांना कॉलनीतील स्थानिक तरुणांनी रंगेहाथ पकडून त्यांना चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. चिंचवडेनगरमधील जय गणेश कॉलनी येथे शुक्रवारी (दि. १०) रोजी पहाटे अडीच-पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
या विषयी कॉलनीतील प्रत्यक्षदर्शी निलेश सोनवणे माहिती देताना म्हणाला, मी आणि माझे मित्र एका कार्यक्रमाहून शुक्रवारी (दि. १०) रोजी पहाटे अडीच -पावणे तीनच्या दरम्यान जय गणेश कॉलनी येथील आमच्या घरी जात होतो. घराजवळ आलो असता दोन तरूण (वय अंदाजे २२ आणि २५) हे कॉलनीतील एका घरासमोर पार्क केलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीतून पेट्रोल काढताना दिसले. त्यांना पाहून आम्ही त्यांच्या नकळत गाडीतून पेट्रोल काढतानाचा फोटो काढला. त्यानंतर आम्ही समोरून येताना दिसताच दोघेही गाडीतून काढलेल्या पेट्रोलच्या बाटलीसह पळाले. दोघांना शिताफीने पकडून चांगलाच चोप दिला. मात्र, झालेल्या झटापटीत दोघांनी वेगवेगळ्या दिशांना पळ काढला. त्यातील एकजण हिंदी बोलत होता. दोन दिवसापूर्वीच कॉलनीतील आणखी एकाच्या गाडीमधून पेट्रोलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी देखील कॉलनीतील रहिवाशांच्या गाड्यांमधून पेटोल चोरीच्या घटना घडल्या आहेत. गाडीमालक पोलीसात तक्रार देणार असल्याची माहिती निलेश याने दिली.