न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर पावणेदोन वर्षांनंतर पहिली ते सातवीचे वर्ग गुरुवारपासून सुरू झाले. महापालिकेच्या निर्णयानुसार शहराच्या वेगवेगळय़ा भागातील शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
याप्रसंगी पालिकेच्या कुदळवाडी शाळेत पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॅाकलेट देऊन ढोल ताशांच्या वाद्यांच्या आवाजाने विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी कुदळवाडी प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर, प्रतिक भासरकर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते. मुख्याध्यापक सगभोर सर यांनी विद्यार्थ्यांना संमतीपत्र भरून घेण्याच्या सूचना दिल्या.