- ग्रेड सेपरेटरचे काम मार्गी लागूनदेखील वाहतूकदारांची अडवणूक..
- वाहतुकीसाठी मार्ग खुला करा; नागरिकांमधून मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- थेरगाव येथील डांगे चौकात महापालिकेतर्फे ग्रेड सेपरेटर उभारण्याचे काम ३ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झाले. चिंचवडमार्गे हिंजवडीला जाणाऱ्या या नियोजित कामाची मुदत १८ महिने होती. मात्र लॉकडाऊनमुळे हा प्रकल्प रेंगाळला. त्यानंतर वेगाने काम पूर्ण करण्यात आले.
डांगे चौक हा खुप वर्दळीचा चौक आहे. या चौकातून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, मुंबई – बंगळुरू महामार्ग आणि किवळे – सांगवी फाटा बीआरटीएस रस्त्याला जाता येते. त्याशिवाय, हिंजवडी आयटी येथेदेखील मोठ्या प्रमाणात वाहनांची ये – जा सुरू असते. वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून येथे ग्रेडसेपरेटर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या ग्रेड सेपरेटरमुळे चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
सध्या या चौकातील ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारा हा ग्रेडसेपरेटर अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी या कामाची पाहणी करून १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आश्वासन दिले होते. ती मुदत संपून नवीन वर्ष उजाडायला आले परंतु, आज अखेरपर्यंत हा ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.