- जीव मुठीत घालून रहदारीच्या रस्त्यावर नागरिकांकडून कचराकोंडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- महापालिकेने रस्टन कॉलनी शेजारील चिंचवडेनगर-वाल्हेकरवाडी मुख्य रस्ता लाखांचा खर्च करून डागडुजी करून घेतला. रंगरंगोटी केलेल्या रस्त्यावर महिन्याभरातच सगळीकडे कचरा पडलेला दिसतोय.
परिसरात घंटागाड्या फिरुनदेखील काही नागरिक रहदारीच्या रस्त्यावर जीव मुठीत घालून रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त करतात.
परिणामी सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक परिसरातील अस्वच्छता शहराच्या सौंदर्याला बाधा आणते आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. महापालिका यात लक्ष घालून रस्त्यावरील कचऱ्याचे व्यवस्थापन करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.