- सिंधुताईंच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, राज्यपालांकडून शोकसंदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ (७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीड हजारांहून अधिक अनाथ मुला-मुलींचे त्या संगोपन करीत होत्या. सिंधुताई सपकाळ यांना गेल्या वर्षी ‘पद्मश्री‘ने गौरवण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई सपकाळ यांनी ममता बाल सदन संस्थेसह बाल निकेतन (हडपसर), सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह (चिखलदरा) अभिमान बाल भवन (वर्धा), गोपिका गायीरक्षण केंद्र (वर्धा), सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था (पुणे) या संस्थांची स्थापना केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने सिंधुताई यांनी परदेश दौरे केले होते. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सर्वाना प्रभावित केले होते.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे. त्यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अॅन्ड प्रॉडक्शन निर्मित ‘अनाथांची यशोदा’ हा अनुबोधपट निघाला होता.
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेने हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे.
मा. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री…
स्वत:च्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊनही सिंधुताईंनी स्वत:ला सावरले आणि हजारो अनाथ मुला – मुलींची आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत.
मा. भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल…