- आता खात्यावर किमान दहा हजार आवश्यक अन्यथा सहाशे रुपये दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या सर्वच सेवांचे शुल्क वाढविले आहे. पीएनबीच्या शाखेत खाते असल्यास आता खात्यावर किमान १० हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतील. पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर सेवा शुल्काच्या वाढीची माहिती देण्यात आली आहे.
खात्यात किमान शिल्लक शुल्क आधी ५ हजार रुपये होती. आता १५ जानेवारीपासून किमान १० हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड लागेल. पाच हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास दंडाची ही रक्कम आधी ३०० रुपये होती. पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखांसाठी किमान शिल्लक मर्यादा १ हजार रुपये कायम ठेवण्यात आली असली तरी एवढी शिल्लक नसल्यास आता ४०० रुपये दंड लागणार आहे. आधी दंडाची रक्कम २०० रुपये होती.
पीएनबीने आपल्या लॉकर शुल्कात ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. छोट्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागासाठी १,००० रुपयांवरून १,२५० रुपये, तर शहरी भागासाठी १,५०० रुपयांवरून २,००० रुपये करण्यात आले आहे. सर्वात मोठ्या आकाराच्या लॉकरचे शुल्क शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी १०,००० रुपये असे कायम ठेवण्यात आले आहे. खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकला अथवा डेबीट अकाऊंटमध्ये पैसे नसतील, तर लागणारा दंड १०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आला आहे. डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठीचे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. चेक परत आल्यास १ लाखांपर्यंतच्या रकमेवर लागणारे शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये, तर एका लाखावरील रकमेवरील शुल्क २०० रुपयांवरून २५० रुपये करण्यात आले आहे.