- तब्बल ९८ किलो गांजा जप्त; तिघेजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- कारमधून गांजा नेला जात आहे. ती कार खेड तालुक्यातील बहुळ गावात एका हॉटेलसमोर आली आहे, अशी माहिती सोमवारी (दि. १०) दुपारी अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हॉटेल परिसरात सापळा लावून कारवाई केली.
आर जे १४ / झेड सी ३३१० या कारमध्ये तिघे आरोपी आढळून आले. तिघांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल ३१ लाख ७३ हजार ७५ रुपये किमतीचा ९८ किलो ८४३ ग्रॅम गांजा आढळला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला. हा गांजा आरोपींनी ओरिसा राज्यातून आणला आहे. हा गांजा आणण्यासाठी आरोपींना एकाने मदत केली. सहाय्यक पोलीस फौजदार जिलानी मुसा मोमीन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चेतन हरिराजी पुरोहित (वय २९, रा. शिरगाव, ता. मावळ, पुणे. मूळ रा. राजस्थान), कांतीलाल मांगीलाल घांची (वय २३, रा. पुनावळे, पुणे. मूळ रा. राजस्थान), मोनिका हकीम सिंह (वय २२, रा. नवी मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कुमकुम (रा. ओडिसा), गणेश उर्फ दीपक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.