- पेटत्या वातेला उंदराचा धक्का लागून घरात पसरली आग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- चिखली नेवाळे वस्तीतील कासारिया सोसायटीतील फ्लॅटमध्ये एका कुटुंबाने देवघरात दिवा लावला होता. दिव्यातील पेटत्या वातेला उंदराचा धक्का लागल्यामुळे पेटत्या वातीची ठिणगी लागून घरात आग पसरली.
खोलीतील मुलाने आरडाओरडा केल्याने हॉलमध्ये बसलेल्या घरातील सदस्यांना आगीची घटना समजली. दरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्याने व सोसायटीतील नागरिकांनी अग्निशामक यंत्रणेच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
हा प्रकार रविवारी (दि. ९) घडला. या आगीमध्ये घरातील सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. घरात कुणीही नसताना दिवे लावू नयेत. तसेच घरात उंदीर असतील तर त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन अग्निशामक विभागाने केले आहे.