- नगरसेवक वसंत बोराटे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू-आळंदी शहराच्या मधोमध वसलेल्या मोशी गावातील भारतमाता चौकात श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार उभारण्याची मागणी नगरसेवक वसंत बोराटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. प्रवेशद्वार उभारल्यास मोशी गावच्या वैभवात भर पडणार असल्याचे म्हटले आहे.
मोशी गावाला सांस्कृतिक वारसा असल्याने ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांचे भाविक संपूर्ण राज्यभर आहेत. पिंपरी – चिंचवड शहराची हद्द मोशीतील इंद्रायणी नदीपर्यंत आहे. देह – आळंदीकडे जाणारा वारकरी संप्रदाय व तसेच पुणे नाशिक महामार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना एक भव्य प्रवेशद्वार दिसावे.
महापालिकेच्या माध्यमातून तयार होणारे श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार देहू – आळंदी रस्त्यावरील भारतमाता चौकात उभे करावे, अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. त्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून माझीदेखील तीच भूमिका असून याठिकाणी श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार मोशीतील भारतमाता चौकात उभारण्यात यावे, असे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बोराटे यांनी म्हटले आहे.