- नगरसेवक अजित गव्हाणे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे आणि राजमाता जिजाऊ महिला महासंघ यांच्या वतीने नागरिकांच्या धार्मिक भावना जोपासण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे भोसरी प्रभाग क्रमांक ५ मधील मंदिरामध्ये निर्माण होणारे निर्माल्य यापुढे घंटागाडीत टाकले जाणार नाही, अशी माहिती नगरसेवक अजित गव्हाणे यांनी दिली.
या निर्माल्याचे जागेवरच खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागातील मंदिरांना निर्माल्य कलश दिले आहेत. त्यात खतनिर्मिती केली जाणार आहे. त्या माध्यमातून प्रभागातील मंदिरे झिरो वेस्ट होणार आहेत. नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून संकल्प स्वच्छतेचा सुंदर भोसरीचा या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण प्रभागात स्वखर्चाने डस्टबीनचे वाटप करण्यात आले आहे. ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृती अभिमान राबविले जात आहे. त्याच्या दुसऱ्या टप्यात प्रभागातील मंदिरातील निर्माल्याचे खत निर्माण करण्याचा महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिक श्रद्धा म्हणून देवाला हार घालतात. फुले, फळे वाहतात. परंतु, मंदिरातील हे निर्माल्य घंटागाडीत टाकले जाते. यातून धार्मिक भावना, श्रद्धा जोपासली जात नसल्याची भावना नागरिकांच्या मनात होती. त्यामुळे निर्माल्यातून खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
प्रभागातील संभाजीनगर येथील संत तुकाराम मंदिर, तुकाई माता मंदिर, साई सिद्धनगर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुकाईनगर, स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ सोसायटी आणि महादेव नगर येथील महादेव मंदिरात निर्माल्य कलशाचे वाटप करण्यात आले आहे.
सार्वजनिक मंदिरातील निर्माल्य घंटागाडीत टाकले जात होते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. त्यातून निर्माल्याचे खत निर्माण करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार प्रभागातील मंदिरात निर्माल्य कलशाचे वाटप करण्यात आले. त्यात खतनिर्मिती केली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– अजित गव्हाणे, नगरसेवक, पिं. चिं. मनपा…